मोदींच्या विजयाची कारणे- भाग २


२. राहुल गांधी आणि काँग्रेस


काँग्रेसच्या पराभवाला, उतरणीला आणि भाजपाच्या सर्वदूर पसरण्याला कोणी जबाबदार असेल तर ते म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधींची सगळ्यात मोठी चूक जर काही असेल तर ती म्हणजे त्यांनी स्वतःची नरेंद्र मोदींबरोबर केलेली तुलना!! राहुल गांधी हे कर्तुत्वानी अथवा व्यक्तिमत्वानी नरेंद्र मोदींच्या जवळपास देखील पोहोचत नाहीत. राहुल गांधी हे एका हिमालयाएवढ्या उंचीच्या व्यक्तिमत्वाशी लढत होते. मोदी ३ वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होते नंतर भाजपाच्या २८२ जागा त्यांनी निवडून आणल्या होत्या आणि पंतप्रधान झाले. त्यासमोर राहुल गांधींच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत उल्लेखनीय असं काहीच नाही. राज्यांच्या निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जर काँग्रेसनी जिंकल्या असतील तर त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा त्या त्या राज्यातल्या स्थानिक नेतृत्वाचा आहे. परंतु काँग्रेसच्या परंपरेनुसार जेव्हा विजय होतो तेव्हा तो गांधींमुळे असतो परंतु जेव्हा पराभव होतो तेव्हा तो गांधी सोडून सगळ्यांमुळे असतो. राहुल गांधींवर भाजपाने आणि मोदींनी नेहमीच वंशवादाचा ठपका ठेवला आहे. परंतु ह्या आरोपाचे उत्तर केवळ आणि केवळ विजय देऊ शकतो. राहुल गांधी हे काँग्रेसची संघटना बांधण्याऐवजी मोदींवर वैयक्तिक आरोप करण्यातच धन्यता मानत होते. काँग्रेससारख्या देशातल्या सर्वात जुन्या आणि मोठ्या पक्षाचा अध्यक्ष होण्यासाठी आडनाव सोडून बाकी काहीच गुणवत्ता लागत नसावी हे देशाचं मोठं दुर्दैव आहे. भाजपाच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी एक निस्पृह संघटना ज्या भक्कमपणाने उभी असते तशी व्यवस्था देशातल्या पहिल्या राजकीय पक्षाला नसावी ह्यात काँग्रेसचं सर्वात मोठं अपयश आहे. काँग्रेसच्या मागे कार्यकर्ते आणि संघटना नसल्यानी त्यांना त्यांचे विचार पोहोचवायला आणि त्यांचं समर्थन करायला अनेक अयशस्वी कलाकारांची आवश्यकता भासते. हे कलाकार जेव्हा आमचे चित्रपट बघा असं लोकांना सांगत असतात तेव्हा त्यांचे चित्रपट कोणी बघत नाही तेव्हा ह्यांनी सांगितल्यावरून राहुल गांधींना लोक मत का देतील एवढा साधा विचार राहुल गांधींनी केला नसेल का? एकीकडे भाजप रस्त्यावर उतरून काम करत होता तर दुसरीकडे काँग्रेस समाजमाध्यमांमध्ये खोट्या बातम्या पसरवून तिथे निर्माण झालेल्या आभासी वातावरणात आनंद मानत होते.


काँग्रेस पक्षाचं सर्वात मोठं अपयश हे आहे कि हा पक्ष आपली नेमकी विचारसरणी काय आहे हेच विसरला आहे. आज सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला जर विचारलं कि काँग्रेसची विचारसरणी काय आहे तर त्याला सांगता येईल ह्याची खात्री नाही. त्यामुळेच जेव्हा मोदी म्हणतात की काँग्रेसमुक्त भारत करा तेव्हा काँग्रेसचे वेडगळ कार्यकर्ते आणि भंपक कलाकार ह्यांना असं वाटत राहतं की मोदींना काँग्रेस पक्ष संपवायचा आहे. काँग्रेसची जी काम न करून केवळ काम भिजवत ठेवण्याची जी कार्यपद्धती आहे त्यावर ओढलेला आसूडदेखील ह्या लोकांना कळत नसेल तर काँग्रेसचं पुनरुज्जीवन केवळ अशक्य आहे. काँग्रेसच्या ढिसाळ कार्यपद्धतीचा सामान्य माणसाला जेव्हा त्रास व्हायला लागला आणि तो देखील भ्रमाच्या भोपळ्यात राहणाऱ्या केविलवाण्या नेत्यांना कळाला नाही तिथेच काँग्रेस हा पक्ष संपला. काँग्रेस स्वतःच्या फुग्यात एवढा अडकला की त्यांच्या पक्षात डाव्या विचारसरणीच्या लोकांचा शिरकाव केव्हा झाला हे त्यांना समजलंच नाही. काँग्रेस पुनरुज्जीवित करायचा असेल तर हे डावे लोक शोधून शोधून बाहेर काढायला लागतील. एकीकडे भाजप आणि मोदी राष्ट्रवाद आणि देशप्रेम ह्यावर लोकांना आकृष्ट करत होते तेव्हा राहुल गांधी हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्या विचारसरणीच्या कन्हैया आणि उमर असल्या देशद्रोही लोकांची पाठ कुरवाळात बसले होते. ह्याचा काय संदेश देशात जातो हेदेखील ह्यांना उमजलं नाही. ७० वर्ष देशातल्या लोकांना गृहीत धरल्यानी ते अजूनही त्याच काळात जगताना दिसतात. देश पुढे गेला आहे परंतु गांधी परिवार अजूनही प्रियांका इंदिरासारखी दिसते असल्या बालिश गोष्टीत अडकून बसली आहे.

काँग्रेसच्या संघटनात्मक गोष्टी ह्यातर त्यांच्या पराभवाला कारणीभूत आहेत तशीच राहुल गांधींची वेडगळ वक्तव्य हीदेखील आहेतच. राहुल गांधी हे पप्पू आहेत हे वेळोवेळी भाजप अधोरेखित करत असतो पण ते तसे नाहीत हे सिद्ध करण्याचा काँग्रेस मुळीच प्रयत्न करताना दिसत नाहीत. आणि राहुल गांधींची भाषणं हे मनोरंजनाचं साधन होत आहेच. राहुल गांधी त्यांच्या ह्या इमेजमधून जोवर बाहेर पडत नाहीत तोवर त्यांची यथेच्छ थट्टा होतंच राहणार.

हे सगळं जरी असलं तरी काँग्रेसनी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून पुढे येणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी अनेक जण गांधी परिवारानी काँग्रेसपासून दूर व्हावं असले सल्ले दिले आहेत. हे म्हणजे रिलायन्स पासून अंबानींना दार व्हायला सांगण्यासारखं आहे. काँग्रेस ही गांधी घराण्याची वैयक्तिक मालमत्ता आहे. गांधी आहेत म्हणून काँग्रेस आहे. फार तर एखाद्या भक्कम नेत्याला संघ बांधणीला लावणं इतपत गोष्टी काँग्रेसमध्ये होऊ शकतात. काँग्रेसकडून फार अपेक्षा करणं हे चुकीचं आहे.

मोदींच्या विजयाची आणखी काही कारणं पुढच्या लेखात

Comments

Popular posts from this blog

मोदींच्या विजयाची कारणे- भाग १