मोदींच्या विजयाची कारणे- भाग १

२०१९ सालच्या सतराव्या लोकसभेचे निकाल हाती आले. सत्ताधारी भाजप पक्षाला तब्बल ३०३ जागा मिळाल्या. एकूणच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा आकडा ३५३ पर्यंत गेला. २०१४ पेक्षा एकट्या भाजपच्या ३१ जागा वाढल्या. राष्ट्रीय आणि स्थानिक अश्या सगळ्याच पातळीवरच्या लोकांनी गेल्या ६ महिन्यात वर्तवलेल्या अंदाजापेक्षा हा निकाल एकदमच वेगळा निघाला. म्हणूनच कि काय राज ठाकरेंनी ह्या निकालाचं "अनाकलनीय" असं वर्णन केलं. म्हणूनच ह्या विजयाचं विश्लेषण महत्वाचं ठरतं. देशपातळीवरचे सर्वच पत्रकार मोदी सरकार गेल्यातच जमा आहे, जमिनीवर वस्तुस्थिती दिसते आहे आणि सरकार जाणं ही केवळ औपचारिकता आहे असं सांगून टाकलेलं असताना मोदी हे पुन्हा गेल्यावेळपेक्षा अधिक मताधिक्क्यानी निवडून येतात ही सामान्य गोष्ट नाही. मोदींच्या विजयाची काही ठळक कारणं आपण बघू

१. स्वतः मोदी
मोदी ही व्यक्ती आजवर कोणालाच समजलेली नाही हे ह्या निकालावरून स्पष्ट होतं. ही निवडणूक केवळ मोदी ह्या नावाभोवती फिरत राहिली. मोदींची हीच इच्छा होती. आणि ही इच्छा त्यांच्या समर्थकांपेक्षा देखील त्यांच्या विरोधकांनी पूर्ण केली. मोदींच्या राष्ट्रीय पातळीवरील आगमनानंतर देशात ज्या ज्या निवडणुका झाल्या त्यात मुद्दा केवळ मोदी हाच होता. अगदी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये असं दिसून आलं कि लोकांना नगरसेवकाचं नाव माहिती नाही, परंतु केवळ मोदींसाठी भाजपला मतदान केलं.  ह्या निवडणुकीत देखील काँग्रेस आणि इतर पक्षांचे उमेदवार म्हणत होते आमची लढाई इथल्या उमेदवारांशी नसून थेट मोदींशी आहे. विरोधकांनी एक प्रचार केला होता कि मोदींना सक्षम विरोधी चेहरा नाही म्हणून मोदी जिंकतात. परंतु त्यांच्या उमेदवारांची वक्तव्य ऐकली तर त्यात अजिबात तथ्य नाही असं दिसून येत. स्वतः मोदींनी देखील मोदी हवा का नको एवढंच विचारलं, मोदी हवा का राहुल/मायावती/अखिलेश असले प्रश्न त्यांनी देखील विचारले नाहीत. देशातल्या तमाम समाजवादी विचारवंतांना आणि पत्रकारांना मोदी आजवर समजले नाहीत आणि समजणार पण नाहीत. मोदी जाळं टाकतात आणि हे लोक अलगद त्यात येतात. कधी कधी तर हे लोक आधी बसतात आणि मग मोदींना जाळं टाकायला सांगतात.
मोदी हे १८ तास काम करतात. आजवरच्या इतिहासात कुठल्याच पंतप्रधानांनी एकही सुट्टी न घेता दररोज एवढं काम केल्याचं ऐकिवात नाही. त्यांच्या परदेश दौऱ्यावर एकीकडे टीका होत असताना मोदी मात्र रात्री प्रवास करून वेळ कसा वाचेल हे बघतात. जनता हे सर्व बघत असते. मोदी स्वतःच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी काही करत नाहीत हे दिसत असतं. त्यामुळे निर्णय योग्य असो वा अयोग्य असो त्यांच्या चारित्र्यावर कोणालाच शंका नाही. म्हणूनच राहुल म्हणाले की आम्ही मोदींची प्रतिमा डागाळणार. आणि इथेच ते चुकले. मोदींवर जेव्हा जेव्हा वैयक्तिक हल्ले झाले आहेत त्या प्रत्येक वेळी मोदींनी मोठी उसळी मारली आहे. एकेकाळी
मोदींचे समर्थक होते परंतु आता त्यांचे चाहते आहेत आणि भारतीय राजकारणातला हा बदल विरोधकांच्या अजून पचनी पडलेला दिसत नाहीये.

मोदींविषयी एक ओरड नेहमी असते ती म्हणजे ते पत्रकारांशी बोलत नाहीत. परंतु त्यांची हीच गोष्ट जनतेला आवडते. ते त्यांना जे सांगायचं आहे ते जनतेला थेट सांगतात. जनतेशी थेट बोलतात. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायला आणि त्यांच्या विचारांचं समर्थन करवून घ्यायला त्यांना पत्रकार आवश्यक वाटत नाहीत. ते आपले विचार मांडतात आणि त्यांचे चाहते त्या विचारांचं समर्थन करतात. जनतेपेक्षा स्वतःला मोठं समजणाऱ्या ह्या पत्रकारांची जखम भरून निघायला अजून बराच वेळ लागेल. "कुबेरा"घरचं वैचारिक दारिद्र्य हेच. मोदींची एक गोष्ट अजून वाखाणण्यासारखी आहे ती म्हणजे धक्कातंत्र. ह्यापूर्वी पंतप्रधानांचे असोत किंवा अजून कुठले निर्णय असोत हे निर्णय "सूत्रांमार्फत" पत्रकार आणि "इतर" वर्गाला मिळत असत. ज्यांना लुटयेन्स मीडिया किंवा आत्ता मोदी म्हणाले ते "खान मार्केट गॅंग" ही दिल्लीतली खरी सत्ताकेंद्र होती. जनतेनी निवडून दिलेले लोक ह्या लोकांच्या तालावर नाचून निर्णय घेत असत. मोदींनी ही प्रथा बंद पाडली. मोदी स्वतः निर्णय घेतात आणि तो योग्य पद्धतीनं लोकांना सांगतात. आपलं वर्चस्व कमी होतंय हे लक्षात आल्यावर ही सत्ताकेंद्र अस्वस्थ झाली आणि मोदी आणि शहा हे हुकूमशहा आहेत असा प्रचार सुरू केला. हा प्रचार मोदींच्या पथ्यावर पडला. कारण जनभावना अशी होती की देशाला असाच ठोस निर्णय घेणारा नेता हवा आहे. ह्या लोकांना धक्का देत मोदींनी पक्षकार्यालय लुटयेन्सच्या बाहेर आणलं. ह्या सरकारमधून कुठल्याही बातम्या "लीक" होत नाहीत ही गोष्ट लोकांना आवडली. आता देखील मोदींचं मंत्रिमंडळ कसं असेल ह्यावर माध्यमं आणि तथाकथित अनुभवी पत्रकार अनेक चर्चा करतील परंतु मोदी काय करतील हे कोणालाच ठोसपणे कळणार नाही कारण ह्यांना मोदी कळलेच नाहीत. ह्या आधीच्या सरकारमध्ये पत्रकार कॅबिनेट ठरवत असत, ही प्रथा मोदींनी मोडली ही बाब लोकांना आवडली.

क्रमशः

Comments

  1. Good one...👍..शब्दांकन छानच..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोदींच्या विजयाची कारणे- भाग २